सामाजिक

रूग्णालयीन बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धतेसाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा

 

महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर

मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील 

दि.६/०४/२०२१.

नेरुळ,

मागील काही दिवसात कोव्हीड बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून त्यांच्यावरील उपचाराकरिता आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे नागरिकांना रूग्णालयीन बेड्स उपलब्धतेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व त्यांना लक्षणांच्या तीव्रतेनुसार योग्य प्रकारचे बेड्स व रूग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात ’24 X 7 तात्काळ रूग्णालयीन बेड्स व रूग्णवाहिका उपलब्धता कॉल सेंटर ( EMERGENCY 24 X 7 HELPLINE FOR HOSPITAL BEDS AND AMBULANCE )’ कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी 022 – 27567460 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रूग्णालय सुविधांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच https://www.nmmchealthfacilities.com हा फॅसिलिटी पोर्टल डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला असून हा रूग्णालयीन सुविधांची माहिती देणारा डॅशबोर्ड नियमित अद्ययावत राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश प्रत्येक कोव्हीड रूग्णालय / महानगरपालिकेची कोव्हीड सेंटर्स याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिका-यांना देण्यात आलेले आहेत.

तथापि अनेक नागरिकांकडून प्राप्त अभिप्रायानुसार फॅसिलिटी पोर्टलवर एखाद्या रूग्णालयात बेड्स उपलब्ध असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात फोन केल्यास बेड उपलब्ध नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर रूग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाने रूग्णालयात फोन न करता तो कॉल सेंटरला करणे अपेक्षित असून तिथून पुढे कॉल सेंटरच्या माध्यमातून रूग्णालयाशी संपर्क साधणे व बेड उपलब्ध असल्याचे संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांना सांगणे ही कार्यवाही कॉल सेंटरमधील डॉक्टरांमार्फत करण्यात येईल.

सध्याचा दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाढत असलेला कोरोना बाधितांचा आकडा पाहता रूग्णालयीन सुविधांवर प्रचंड ताण असून कोरोनाची बाधा झाल्यास वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यातील दिवसेंदिवस कठीण होत चाललेली संपूर्ण राज्यातील स्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे हे लक्षात घ्यावे आणि सुरक्षित अंतरासह सतत हात धुण्याची सवय लावून घेऊन स्वत:ला व इतरांना कोरोना बाधित होण्यापासून वाचवावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Kapil Mitake

Contact Me : 9850768718

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close